ग्रामपंचायत ही गावाचा कारभार चालवणारी स्थानिक संस्था आहे. गावातील पाणी, स्वच्छता, रस्ते, दाखले आणि योजना यांची जबाबदारी तिच्यावर असते.
ग्रामपंचायत कशी असते?
ग्रामपंचायत ही गावपातळीवरची स्थानिक स्वराज्य संस्था आहे. गावातील लोक मतदानाने सरपंच आणि सदस्य निवडतात. हे निवडून आलेले प्रतिनिधी गावाच्या विकासाचे निर्णय घेतात.
कोण कोण असते?
- सरपंच: ग्रामपंचायतीचा प्रमुख. सभा बोलावणे आणि कामांवर देखरेख ठेवणे ही त्याची मुख्य कामे आहेत.
- उपसरपंच: सरपंचाला मदत करतात आणि गरज पडल्यास त्याची जबाबदारी सांभाळतात.
- सदस्य: प्रभागातील लोकांचे प्रतिनिधी. ते सभेत गावाच्या प्रश्नांवर बोलतात आणि निर्णयात भाग घेतात.
- ग्रामसेवक (ग्रामपंचायत अधिकारी): शासकीय कर्मचारी. ते ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून काम करतात, नोंदी आणि हिशोब ठेवतात, सभेचे इतिवृत्त लिहितात आणि जन्म-मृत्यू नोंदणीसारखी कामे पाहतात.
ग्रामपंचायत कोणती कामे करते?
- पिण्याचे पाणी आणि स्वच्छता
- गावातील रस्ते, गटारे आणि पथदिवे
- जन्म-मृत्यू नोंदणी आणि विविध दाखले
- घरपट्टी, पाणीपट्टी यांसारखे कर गोळा करणे
- शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि लाभार्थ्यांची माहिती
- गावाच्या विकासकामांचे नियोजन आणि हिशोब
ग्रामसभेचे स्थान
ग्रामसभा म्हणजे गावातील सर्व मतदारांची सभा. ग्रामपंचायत आपले काम आणि हिशोब ग्रामसभेसमोर मांडते. त्यामुळे नागरिक थेट प्रश्न विचारू शकतात.
वरचे स्तर
ग्रामपंचायतीच्या वर तालुका स्तरावर पंचायत समिती आणि जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद असते. पंचायत समितीत गटविकास अधिकारी (BDO) असतात, तर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. ग्रामपंचायतीकडून काम न झाल्यास तक्रार या कार्यालयांकडे करता येते.
हा विषय ग्रामनेत्र नागरिक मार्गदर्शिकेच्या प्रकरण १ “ग्रामपंचायत : परिचय व रचना” मध्ये (पान 12) आहे. मार्गदर्शिका डाउनलोड करा
या विषयावरील प्रश्न
ग्रामपंचायत म्हणजे काय?
ग्रामपंचायत ही गावाचा कारभार चालवणारी स्थानिक संस्था आहे. गावातील लोकांनी निवडलेले सरपंच आणि सदस्य गावाच्या पाणी, स्वच्छता, रस्ते आणि विकासकामांचे निर्णय घेतात.
सरपंचाला सर्व अधिकार असतात का?
नाही. सरपंच ग्रामपंचायतीचा प्रमुख असतो, पण महत्त्वाचे निर्णय ग्रामपंचायतीच्या सभेत कायदा आणि नियमांनुसार घ्यावे लागतात. आर्थिक व्यवहारांसाठी ग्रामसेवकाचीही भूमिका असते.
ग्रामसेवक कोण असतो?
ग्रामसेवक (ग्रामपंचायत अधिकारी) हा शासकीय कर्मचारी असून ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो. तो नोंदी, हिशोब आणि सभेचे इतिवृत्त ठेवतो आणि दाखल्यांसारखी कामे पाहतो. त्याच्या कामाबद्दल तक्रार असल्यास पंचायत समितीतील गटविकास अधिकाऱ्याकडे करता येते.
हे देखील वाचा
- लेख
ग्रामसभा: तुमचे हक्क आणि सहभाग
ग्रामसभा म्हणजे गावातील सर्व मतदारांची सभा. येथे ग्रामपंचायत आपले काम आणि हिशोब मांडते आणि नागरिकांना प्रश्न विचारता येतात.
- लेख
ग्रामपंचायतीकडून मिळणारे दाखले आणि प्रमाणपत्रे
जन्म, मृत्यू, रहिवासी, कर आणि थकबाकी नसल्याचे दाखले कशासाठी लागतात आणि अर्ज करताना काय लक्षात ठेवावे ते सोप्या शब्दांत.
- लेख
ग्रामपंचायतीचा निधी, अंदाजपत्रक आणि हिशोब
ग्रामपंचायतीला पैसे कुठून येतात, ते कसे खर्च होतात आणि अंदाजपत्रक व जमाखर्च कसा वाचावा ते सोप्या शब्दांत.